News & View

ताज्या घडामोडी

पैसे घेतल्याचा आरोप, उमेदवाराला फासले काळे!

बीड -विधानसभा निवडणुकीत अनेक उमेदवार हे मत खाण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी उभे राहतात अशी चर्चा नेहमी होते. मात्र त्याबद्दल अधिकृत कोणीही समोर येऊन बोलायला तयार नसत. मात्र बीडच्या केज मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला भाजप उमेदवाराकडून पैसे घेतल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी मारहाण करत काळे फसल्याची घटना समोर आली आहे.

बीडच्या केज मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन चव्हाण हे प्रचार करत असताना त्यांच्या तोंडाला काळे फसत मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सचिन चव्हाण यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी केला असून यामुळेच शैलेश कांबळे यांच्यासह वंचितच्य स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सचिन पवार यांच्या तोंडाला काळे फासले तसेच चाबकाने मारहाणही केली.

याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याचेही शैलेश कांबळे यांनी सांगितले आहे. या घटनेची सध्या जिल्ह्यात चर्चा होत असून याबाबत अद्याप पोलिसांत नोंद झालेली नाही.

सचिन चव्हाण यांनी बीडच्या केज विधानसभा मतदार संघातून सुरुवातीला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली होती. वंचितने त्यांना अधिकृत उमेदवारीही जाहीर केली होती. वंचितकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सचिन चव्हाण यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप केला जात आहे, ज्याचे व्हिडिओही समोर आले. ज्यानंतर वंचितच्या स्थानिक नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची बदनामी केल्याचा आरोप करत चव्हाण यांना मारहाण केली.

दरम्यान, या राड्यानंतर वंचितचे उमेदवार सचिन चव्हाण यांनी जाहीर माफीही मागितली आहे. मी अपक्ष अर्ज भरल्यानंतर मला निधीची गरज होती, मी माझ्या मित्रांकडे पैशाची मागणी केली होती. यावेळी माझ्या भाजपच्या मित्रांनी दोन लाखांची मदत केली होती. तसेच वंचितकडून अधिकृत उमेदवारी मिळाल्यानंतर दोन वेळा 50- 50 हजार रुपये दिले असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. तसेच माझ्याकडून चूक झाली यावर पक्ष जी कारवाई करेल, ती मला मान्य आहे, असंही सचिन चव्हाण म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *