पुणे -मी ज्याच्यासोबत आहे त्याच्यासोबत इमानदारी दाखवली म्हणून माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव आखला जातं आहे, पण माझ्या नशिबात संघर्ष पाचवीला पुजला आहे, त्यामुळे तुमच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने मी कोणाला घाबरत नाही, तुम्ही साथ द्या, मी तुमच्यासोबत कायम राहील असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
पुणे येथे आयोजित विद्यार्थी संवाद मेळाव्यात मुंडे बोलत होते. बीड जिल्ह्यातील आणि परळी मतदार संघातील विद्यार्थ्यांशी मुंडे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, या मेळाव्याला पंकजा मुंडे देखील येणार होत्या, पण त्या दिल्लीत आहेत, त्यांनी माझ्याजवळ शुभेच्छा संदेश दिला आहे. मी पुण्यात शिकलो असं सांगत मुंडे यांनी पुण्याचं अन माझं एक वेगळं नातं आहे असं म्हटलं.
माझ्या राजकीय प्रवासात मी अनेक संघर्ष पाहिले. रोज नव्या आव्हानांना तोंड देत मी इथपर्यंत पोहचलो आहे. राजकीय वाटचालीत मला अजित पवार यांनी जी साथ दिली ती ना विसरता येणारी आहे. मी दीड वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून काही लोक मला संपवण्याची भाषा करू लागले आहेत.
माझ्यावर खालच्या पातळीला जाऊन आरोप केले जातं आहेत, माझी जातं, माझी लायकी काढली जातं आहे. एवढ्या मोठ्या माणसाने असं बोलण योग्य नाही. पण मी कोणाला भीत नाही, घाबरत नाही. कारण तुमचा अन परळी करांचा आशीर्वाद सोबत आहे.
पुढच्या काळात बीड जिल्ह्याला विचारात घेतल्याशिवाय राज्याचं राजकारण पूर्ण होणार नाही. स्व. मुंडे यांनी जिल्ह्याचे नाव देशात केलं, मी माझ्या पद्धतीने जिल्ह्याचे नाव मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही सोबत रहा अन आशीर्वाद द्या असं म्हणत मुंडे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
Leave a Reply