News & View

ताज्या घडामोडी

डिसेंबर अखेर बायपासवर उड्डाणपुल करण्याचे न्यायालयाचे निर्देश!

बीड – बीड बायपासवर दिवसेंदिवस होत असलेले अपघात आणि जाणारे जीव यांची दखल आता मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून यासंदर्भातील आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्णय दिला असून, डिसेंबर २०२४ पर्यंत १२ कि.मी. अंतर असलेल्या बीड शहराच्या लगत असलेल्या बायपासवर छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक येथे उड्डाणपूल तसेच इमामपूर रोड, माजलगाव रोड, परळी रोड या ठिकाणांवर स्लीप सर्विस रोड मंजूर करण्याचे निर्देश मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ यांनी एराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.


राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून औरंगाबाद-येडशी महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे काम २०१५ साली सुरू करण्यात आले होते. याच कामांतर्गत महामार्गावर बीड शहराच्या पूर्व बाजूने १२ कि.मी. अंतराचा बायपास म्हणजेच बाह्यवळण रस्ता तयार करण्यात आला. परंतु हा बायपास तयार करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) गाईड लाइन्स प्रमाणे काम केले नाही. इंडियन रोड काँग्रेसच्या (IRC) च्या गाईड लाइन्स नुसार बायपासला क्रॉस होणार्‍या राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग याठिकाणी स्लीप सर्विस रोड करणे आवश्यक आहे.

परंतु बीड बायपासवर बीड-परळी रोड हा राष्ट्रीय महामार्ग, बीड-माजलगाव हा राज्य महामार्ग व बीड-इमामपूर हा प्रमुख जिल्हा मार्ग असे तीन महत्वाचे रस्ते क्रॉस होतात. तसेच बीड शहरात महामार्गावरून प्रवेश करताना असलेले छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल करण्यात आलेला नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी आवश्यक असलेल्या बाबींचे पालन न केल्यामुळे आत्तापर्यंत दोन्ही चौकांमध्ये एकूण १३ लोकांचा बळी गेल्याची नोंद आहे. तर दरदिवस अपघात होऊन असंख्य लोक जखमी होत आहेत.


सदरील बाबी नागरिकांच्या, प्रवाशांच्या आणि वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे याबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना ४ डिसेंबर २०१९ रोजी, बीड बायपासवर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या दोन्ही ठिकाणी म्हणजेच महालक्ष्मी चौक व छत्रपती संभाजी महाराज चौक येथे उड्डाणपूल तसेच बीड-परळी रोड, बीड-माजलगाव रोड व बीड-इमामपूर या तीन ठिकाणी स्लीप सर्विस रोड मंजूर करण्याबाबत पत्रव्यवहार केला. यावर मा.नितीन गडकरी यांनी १४ जुलै २०२० रोजी पत्राद्वारे सदरील कामे करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचविले होते. त्यानंतर आ.संदीप क्षीरसागर यांनी सदरील कामांच्या मंजुरीची शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावी अशी वारंवार मागणी केली.

तसेच माजी आ.सय्यद सलीम यांनीही बायपासवर दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल आणि तीन ठिकाणी स्लीप सर्विस रोड मंजूरीसाठी पत्रव्यवहार करत पाठपुरावा केला. परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत दखल घेतली जात नसल्याने शेवटी माजी आ.सय्यद सलीम यांनी मा.उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक ११७६/२०२४ व पिटीशन क्रमांक ८८०८/२०२४ दाखल केली. या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी न्यायमूर्ती रविंद्र व्ही. घुगे व न्यायमूर्ती वाय.जी.खोब्रागडे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांचे म्हणने राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य कार्यालय, द्वारका, नवी दिल्ली येथे पाठविले असून या कामासाठी तांत्रिक समिती देखील स्थापन केली आहे.

तसेच मार्च २०२५ पर्यंत बीड बायपासवर छत्रपती संभाजी महाराज चौक व महालक्ष्मी चौक याठिकाणी उड्डाणपूल व इमामपूर रोडच्या स्लीप सर्विस रोडला मंजुरी देऊ असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून न्यायालयात सांगण्यात आले. परंतु न्यायालयाने या ठिकाणी होत असलेले अपघात आणि सुरक्षेच्या प्रश्नाची गंभीर दखल घेत डिसेंबर २०२४ पर्यंत तीनही कामांना मंजुरी द्या असे निर्देश दिले.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे बीड बायपासवरील अपघात आणि सुरक्षेचा प्रलंबित असलेला मोठा प्रश्न मार्गी लागणार असून आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान या प्रकरणात याचिकाकर्ते माजी आ.सय्यद सलीम यांच्या वतीने ॲड.सय्यद तौसिफ यासीन यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *