News & View

ताज्या घडामोडी

वीस वर्षांपासून गायब असणाऱ्या कर्मचाऱ्यावर जिल्हा परिषद मेहेरबान!

बीड -तब्बल वीस वर्षापेक्षा अधिक काळापासून जिल्हा परिषदेत नोकरीवर नसलेल्या आणि चारवेळा गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्याला पुढारी आणि प्रशासन पाठीशी घालत आहे. वित्त विभागातील कर्मचारी धनंजय धसे यांच्यावर तात्काळ बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी उल्हास संचेती यांनी केली आहे.

बीड जिल्हा परिषदेत आंधळं दळतंय अन कुत्र पीठ खातंय अशी अवस्था झालेली आहे. अनेक कर्मचारी विना परवानगी प्रतिनियुक्तीवर बीडमध्येच ठाण मांडून आहेत. अनेकजण तर कार्यालयात न येताच महिन्याला पगार उचलत आहेत. मात्र जिल्हा परिषदेचे प्रमुख याकडे साफ कानाडोळा करत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात नोकरीस असलेले धनंजय धसे हे मागील वीस वर्षांपासून एक दिवसही कार्यालयात आलेले नाहीत. हजेरी मस्टर असो कि आवकात जावक अथवा हालचाल रजिस्टर यावर त्यांची नोंद नाही. तरीदेखील महिन्याला त्यांना वेतन, भत्ते, व इतर लाभ दिले जातं आहेत.

याबाबत उल्हास संचेती यांनी मागील वर्षभरापासून जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय या स्तरावर पाठपुरावा केला आहे, मात्र पुढारी आणि अधिकारी धसे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप संचेती यांनी केला आहे.

धसे हे विनपरवानगी गैरहजर तर आहेतच पण त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकरणात चार गुन्हे दाखल आहेत, मात्र तरीही त्यांच्यावर निलंबन किंवा विभागीय चौकशी, खाते अंतर्गत चौकशी करण्यात आलेली नाही. धसे हे राजरोसपने सरकारची फसवणूक करत आहेत. याबाबत तात्काळ त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी संचेती यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *