News & View

ताज्या घडामोडी

मुंडेना राष्ट्रवादीत घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन -जयंत पाटील!

बीड -कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पंधरा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये घेणे हा आमचा आत्मघातकी प्लॅन होता अशी टीका करत जनतेच्या जीवावर आम्ही विधानसभा निवडणूक जिंकू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

बीड येथे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यावर आली आहे, त्यामुळे कामाला लागा असे आदेश दिले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिले.

कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पाटील म्हणाले कि, निवडणुका जवळ आल्या आहेत. आता सर्वांनी जोमाने कामाला लागा. ज्याप्रकारे लोकसभा निवडणुकीत संविधान वाचवण्यासाठी मतदानरूपी योगदान दिले त्याचप्रमाणे आता भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी योगदान द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी बीड येथे झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.

शनिवारी (दि.२७) रोजी राष्ट्रवादी भवन बीड येथे बीड जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील उपस्थित होते. यावेळी आ.जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदारसंघनुसार आढावा घेतला. इच्छुक उमेदवार कार्यकर्ते आपल्या शिष्टमंडळ आणि समर्थकांना घेऊन मुंबईला बोलावणे योग्य वाटत नसल्यामुळे मी स्वतःच, आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जात आहे.

आपल्याला शेतकरी, कामगार, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, युवक या सर्वांना सोबत घेऊन आपल्या महाराष्ट्रात लोकशाही व संवैधानिक मार्गाने काम करणारे सरकार स्थापन करण्यासाठी येणार्‍या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवावे लागेल आणि त्यासाठी सर्वांनी आतापासून कामाला लागा. असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

यावेळी बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर, जिल्ह्यातील पक्षाचे सर्व माजी आमदार, प्रमुख पदाधिकारी आणि जिल्ह्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून आणू- आ.संदीप क्षीरसागर

बीड जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पवार साहेबांच्या विचारांचा बालेकिल्ला आहे. बीड जिल्ह्यातील जनता ही पुरोगामी विचारांशी एकनिष्ठ आहे. यापुर्वीचा इतिहास पाहता आत्तापर्यंत पवार साहेबांची साथ जिल्ह्याने कधीच सोडली नाही. मग २०१९ ची विधानसभा निवडणुक असेल किंवा नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुक असेल.‌ प्रत्येक वेळी जिल्ह्यातील जनतेने पुरोगामी विचारालाच कौल दिला आहे. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष किंवा महाविकास आघाडीसाठीचे सर्व उमेदवार निवडून आणू. जिल्ह्यातील सहाच्या सहा मतदारसंघात आपले उमेदवार निवडून येतील. असा विश्वास आ.संदीप क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *