मुंबई- कायदा हातात घेण्याचा आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल शिवराळ भाषा कोणी वापरत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भाषा बोलत आहेत असा आरोप देखील शिंदे यांनी केला.
सगेसोयरे मुद्यावरून सोळा दिवसापासून उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी आयोजित केलेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले.
उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांच्या टिकेला सडेतोड उत्तर दिले. जरांगे हे प्रामाणिक पणे प्रयन्त करत असल्याचे मला जाणवले म्हणून आपण दोनवेळा त्यांना भेटायला गेलो,मात्र ते जर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह बोलणार असतील तर तर सहन केले जाणार नाही.जरांगे यांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर सरकार कारवाई करेल असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.
अजित पवारांचा ईशारा –पोलीस यंत्रणा खोलात जाऊन तपास करत आहे, सर्वांनीच सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा चालवली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी शिवरायांची शपथ घेतली, त्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली, पण मार्ग काढायचा प्रयत्न केल्यानंतर आपण काय बोलतोय, कसं बोलतोय? अधिकाऱ्यांना बोलताना त्यांच्यांशी शिवराळ भाषा वापरली जात आहे. हे नेमकं कोण करतंय? हे पाहणं गरजेचं आहे,’ असं अजित पवार म्हणाले.
‘राज्यात एकोपा राहावा यासाठी मुख्यमंत्री स्वत: गेले होते. आतापर्यंत घेतलेला निर्णय टिकला नाही, पण आता बारकाईन लक्ष घातलं. आता सुद्धा वक्तव्य केली जात आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल भाषा सांभाळावी. कोणीही असं समजू नये, की आपण काहीही केलं तरी चालेल, तसं नाहीये,’ असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले-मनोज जरांगे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची स्क्रिप्ट का मांडावी असा प्रश्न पडला आहे. असे म्हणत फडणवीसांनी जरांगेंच्या आरोपावर बोलणे टाळले. जरांगेंना सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न झाला का? या प्रश्नावर उपमुख्यमंत्री म्हणाले, तुम्हाला तरी हे पटते का? या आरोपांवर तुम्हाला काय वाटते? असा उलट सवाल फडणवीसांनी पत्रकारांना केला.
Leave a Reply