बीड- सर्वसामान्य ठेवीदारांनी मोठ्या मेहनतीने कमावलेला पैसा जर एखाद्या मल्टिस्टेट किंवा पतसंस्थेत ठेवला तर तो कधी काढायचा अन कधी नाही याचा सर्वस्वी अधिकार त्याचा आहे.त्याला गरज लागेल तेव्हा तो हवे तेव्हढे पैसे काढू शकतो,त्याला सर्व्हिस देणं हे त्या संस्थेचे कर्तव्य आहे.मात्र गेवराईच्या काही पतसंस्था मालकांनी यापुढे एका ठेवीदाराला दररोज प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जो बेकायदेशीर आहे.अशा पध्दतीने कारभार करणे म्हणजे सहकार नावाला हरताळ फासण्याचा प्रकार आहे.
बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात अनेक मल्टिस्टेट आणि पतसंस्था बंद पडल्या. यामध्ये हातावर पोट भरणाऱ्यापासून ते अनेक धनदांडग्यांच्या लाखो,करोडो रुपये अडकले.परिवर्तन असो की मातोश्री अथवा जिजाऊ माँ साहेब किंवा ज्ञानराधा ,साईराम या मल्टिस्टेट आणि पतसंस्था मध्ये हजारो ठेवीदारांनी त्यांच्या घामाचा पैसा गुंतवला.
विश्वास अन सचोटीच्या गप्पा मारणाऱ्या या मल्टिस्टेट वाल्यांनी लोकांच्या पैशावर गूळ कारखाने,तेल उद्योग अन प्लॉटिंग चा व्यवसाय केला.एकेकाकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती अल्पावधीतच जमा झाली.
सामान्य ठेवीदारांच्या ठेवींवर हे मालक गब्बर झाले.कोणत्या तरी धंद्यात फटका बसला अन हे लोक रस्त्यावर आले.त्यामुळे मल्टिस्टेट अन पतसंस्था ला टाळे लागले.याचा सगळ्यात जास्त फटका ठेवीदारांना बसला.
बीडमधील एकामागोमाग एक मल्टिस्टेट अन पतसंस्था बंद झाल्या.त्यात मंगळवारी साईराम अर्बन ची भर पडली.ही पतसंस्था बंद झाल्यानंतर गेवराई येथे शहर आणि तालुक्यातील पतसंस्था, मल्टिस्टेट चालक, मालक यांनी एक बैठक घेतली.यामध्ये अफवेमुळे होणाऱ्या त्रासामुळे यापुढे प्रत्येक ग्राहकाला केवळ दहा हजार रुपये दररोज देण्याचा निर्णय घेण्यात आला.
वास्तविक सहकार विभागाच्या कायद्यानुसार ठेवीदारांनी बँक,पतसंस्था, मल्टिस्टेट या ठिकाणी जर आपली ठेव ठेवली तर त्याला मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी केव्हाही आपली रक्कम परत घेण्याचे अधिकार आहेत.गेवराईच्या बैठकीत जो निर्णय झाला तो बेकायदेशीर अन सहकार विभागाच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे.लोकांचे पैसे सांभाळणे हे त्यांचे काम आहे,जर ते सांभाळू शकत नसतील तर शाखा बंद कराव्यात मात्र अशा पध्दतीने मनमानी कारभार करता येणार नाही.
लोकहो जर तुमचे हक्काचे पैसे दहा दहा हजाराने दिले जाण्याचा निर्णय होत असेल तर अशा लोकांवर तुम्ही भरवसा कसा ठेवणार,आज ना उद्या हे लोक खोटे ठरले तर तुमच्या पैशाच काय होणार?या सगळ्या गोष्टींचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा अन जास्त व्याजाच्या हव्यासापोटी मल्टिस्टेट अन पतसंस्था यांच्या जाळ्यात न अडकता आपला पैसा राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवा.तुम्ही आजच हे पैसे काढण्यासाठी तगादा लावला तर असा मनमानी निर्णय घेणाऱ्यांना धडा मिळेल अन तुमचे पैसे तुम्हाला मिळतील.
Leave a Reply