बीड-कोरोनाच्या काळात बीड जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या बगलबच्यामार्फत कोट्यवधी रुपये कसे लुटले अन शासनाची फसवणूक केली याचे उत्तम उदाहरण म्हणजे धारूर येथील ऑक्सिजन प्लांट होय.या प्रकरणात अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पध्दतीने कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा केला,मात्र चौकशी समितीला बीडचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्यच केले नाही.पाहिजे ती आवश्यक कागदपत्रे दिलीच नाहीत,त्यामुळे तिसऱ्यांदा समिती चौकशीला आली आहे.आता तरी या समितीला पुरेशी माहिती दिली जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्याची परवानगी नसताना बीड जिल्ह्यातील धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात हा प्लांट उभारण्याचा खटाटोप जिल्हा शल्य चिकित्सक, औषध निर्माता अधिकारी आणि स्टोर किपर यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.नियम पायदळी तुडवत या लोकांनी काम अपूर्ण असताना सर्व देयक देऊन शासनाची फसवणूक केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.त्यामुळे या ठाकर आणि रियाज यांनी घातलेला गोंधळ डॉ सुरेश साबळे आणि तत्कालीन इतर जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंगावर शेकणार अशी चिन्हे आहेत.
बीड जिल्ह्यातील धारूर येथे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट अपूर्ण अवस्थेत असताना सगळी बिले अदा केल्याची तक्रार झाली.त्यानंतर लातूर येथील सहायक संचालक डॉ एस जी पाठक यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीने 12 जुलै2023 रोजी धारूर येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.तसेच त्यावेळी हजर असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ आदमाणे,सहायक अधीक्षक फ्रान्सिस रेड्डी,लिपिक के एस जगताप,औषध निर्माण अधिकारी डी डब्ल्यू बरडे आणि बीडचे औषध निर्माण अधिकारी रियाज शेख हजर होते.या समितीने बीडचे औषध निर्माण अधिकारी तानाजी ठाकर यांना सर्व कागदपत्रे घेऊन लातूर येथे चौकशीला बोलावले होते,परंतु ते गैरहजर राहिले आणि त्यांच्याऐवजी रियाज शेख लातूर ला गेले,परंतु त्यांनी देखील अपूर्ण कागदपत्रे सादर केली.त्यावेळी समितीने पुन्हा ठाकर यांना पाचारण केले.ठाकर हे 19 जुलै रोजी पुन्हा एकदा अपूर्ण कागदपत्रे घेऊन समितीसमोर हजर झाले.याचाच अर्थ ठाकर यांना हे प्रकरण दडपून टाकायचे होते.
या सगळ्या गैरप्रकारांना जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक,औषध निर्माण अधिकारी व इतर कर्मचारी जबाबदार असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई या समितीने प्रस्तावित केली .
परंतु चौकशी समितीला तानाजी ठाकर,रियाज आणि एजाज यांनी कागदपत्रे दिलीच नाहीत.केलेला घोटाळा दडपण्यासाठी प्रयत्न केले गेले,मात्र यात या तिघांच्याही बीड येथून बदल्या झाल्या.त्यामुळे आता पुन्हा एकदा समिती आली आहे ,आता यात दोषी सीएस व इतरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Leave a Reply