छत्रपती संभाजीनगर – आष्टी येथील शेतकरी गौरव धुमाळ यांचे घर जेसीबी क्रेनच्या साह्याने तोडल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
आष्टी तालुका आष्टी जिल्हा बीड येथील शेतकरी गौरव साहेबराव धुमाळ यांचे सर्वे नंबर 145 मध्ये राहते घर शेड जेसीबी व क्रेनच्या साह्याने जुनेद हारून शेख व उमेद पठाण व जेसीबी चालक हरी धोंडे इतर दहा-बारा लोकांनी काढून टाकले तसेच शेतातील पाईपलाईन घरातील किमती वस्तू याचे नुकसान केले. सदरील आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवावा अशी विनंती पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन आष्टी यांना गौरव धुमाळ यांनी ०६/०९/२०२२ रोजी केली होती.
परंतु आष्टी पोलिसांनी सदरील प्रकरणात गुन्हा नोंदविला नाही. तेव्हा गौरव धुमाळ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिनांक 8/9/2022 रोजी वरील गुन्ह्याबाबत तक्रार देऊन वरील लोकांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवा अशी विनंती केली होती व सदरील लोकांनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व सदरील जमीन आमदार सुरेश धस यांनी घेतली असे सदरील आरोपींनी श्री धुमाळ यांना सांगितल्याचे नमूद केले होते. वरील आरोपींनी धुमाळ यांच्या घरातील सामान कुलर, मोटरसायकल, इलेक्ट्रिकल मोटारी, पलंग, गादी सामान उघड्यावर फेकून दिले असे नमूद केले होते. पोलीस स्टेशन व डी.वाय.एस.पी यांनी देखील त्याची फिर्याद घेतली नाही.
सदरील तक्रारीत नासधूस झाल्याचे, वस्ती पाडल्याचे फोटो देखील दाखल केले होते परंतु, ते सुद्धा पाहिले नाहीत असे नमूद केले होते परंतु पोलीस अधीक्षक बीड यांनी देखील सदरील प्रकरणात दखल न दिल्यामुळे गौरव धुमाळ यांनी ॲड. नरसिंह एल. जाधव यांच्यामार्फत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठांमध्ये फौजदारी याचिका क्रमांक 311/2023 दाखल केली होती. सदरील प्रकरणात सुरुवातीला माननीय उच्च न्यायालयाने पोलीस अधीक्षक बीड तसेच आष्टी पोलीस स्टेशन यांना नोटीस काढून त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. वरील याचिकेची सुनावणी दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे माननीय न्यायमूर्ती मंगेश पाटील व माननीय न्यायमूर्ती अभय वाघवासे यांच्यापुढे झाली असता. याचिकाकर्त्याचे वकील ॲड. नरसिंह जाधव यांनी माननीय उच्च न्यायालयाला असे निदर्शनास आणून दिले की सर्वे नंबर 145 मध्ये त्याच्या मालकीची जमीन असून सदरील जमिनीचा तो सहधारक असून त्यामध्ये त्यांनी त्याचे पत्राचे शेडचे घर बांधलेले असून त्या ठिकाणी तो राहत आहे. परंतु दुसऱ्या सहधारकाने जमिनीची वाटणी न होता त्याचा हिस्सा काही लोकांना विकला व त्यानंतर सदरील लोकांनी वरील जमिनीमध्ये बेकायदेशीर घुसून त्याचे राहते घर शेड हे उद्ध्वस्त करून टाकले व त्या संदर्भात दिनांक 6/9/2022 व आठ ८/9/2022 रोजी पोलीस अधिकारी यांना तक्रार देऊनही संबंधितावर गुन्हाही दाखल झाला नाही किंवा पंचनामाही करण्यात आला नाही. सदरील प्रकरणात त्याचे राहते घर व ताबा असताना आरोपींनी उद्ध्वस्त करून टाकले. सदरील आरोपीवर दखलपात्र गुन्हा असल्यामुळे संबंधितावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करणे हे पोलिसाची कर्तव्य आहे परंतु पोलिसांनी सदरील प्रकरणात गुन्हा दाखल केला नाही.
सहाय्यक सरकारी वकील यांनी तपासी अंमलदार यांनी सदरील प्रकरणात चौकशी केलेला अहवाल माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल केला व तपासी अंमलदार यांच्या निष्कर्षानुसार सदरील प्रकरण हे दिवाणी स्वरूपाचे असल्यामुळे तक्रारदार यांनी दिवाणी न्यायालयात दाद मागावी असे नमूद केले होते. परंतु मान्य उच्च न्यायालयाने सदरील प्रकरणात तक्रार यांनी दाखल केलेली तक्रार व तपाशी अमलदार यांचा अहवालातील कागदपत्रे पाहून प्राथमिक दर्शनी सदरील प्रकरणात दखलपात्र गुन्हा घडत घडला असल्यामुळे तक्रारदार यांच्या तक्रारी प्रमाणे व दाखल केलेल्या फोटोग्राफ प्रमाणे सदरील प्रकरणात संबंधितावर तात्काळ गुन्हा नोंदवावा व त्याचा तपास करावा अशी आदेश माननीय उच्च न्यायालयाने आष्टी पोलीस स्टेशन यांना दिले.
याचिकाकरते गौरव धुमाळ यांच्यावतीने ॲड. नरसिंह जाधव यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ॲड. एम.एम. नेरलीकर यांनी काम पाहिले
Leave a Reply