विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर
आपण कोणाच्या पोटी जन्म घ्यावा ,आपला धर्म कोणता असावा ,आपली जात कोणती असावी, आपला पंथ कोणता, असावा आपली भाषा कोणती असावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं नाव काय असावं हे कोणाच्याच हातात नसतं .विशेष म्हणजे अनेक वेळा कोण कुठल्या जातीत जन्मला म्हणून तो मोठा झाला तेव्हा त्याने नावलौकिक मिळवला असं एकही उदाहरण नाहीये. तरीदेखील काही लोक जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीची समूहाची जात काढून किंवा धर्म काढून त्याला त्रास देण्याचा त्याच्या जातीला त्रास देण्याचा प्रयत्न करतात .हा सगळा जो काही प्रकार आहे तो किळस आणणार आहे आणि जर का तुमच्या मताच्या लांगुल चालण्यासाठी तुम्ही मंत्रीपदावर असून देखील जातीयवाद किंवा धर्मा धर्मात तेढ आणणारी वक्तव्य वारंवार वारंवार जाणीवपूर्वक करत असाल तर तुम्हाला त्या मंत्रिपदावर राहण्याचा कुठलाच अधिकार नाही .मात्र निर्लज्जम सदा सुखी या पद्धतीने वागण्याचा चंग काही लोकांनी बांधला आहे त्याचं सध्याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे होय .
छगन भुजबळ यांचा आणि ब्राह्मण समाजाचा नेमका प्रॉब्लेम काय आहे हे माहीत नाही ,पण मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना भुजबळांनी संभाजी, शिवाजी ही नावे ब्राह्मण समाजात ठेवली जात नाहीत असा जावई शोध लावला. आता ब्राह्मण समाजात कोणती नाव ठेवायची आणि कोणती नाही हे पूर्वीपासून लोक भुजबळांच्या वाडवडिलांना विचारत होते का?भुजबळ यांचे पूर्वज हे पंचांग सांगत होते का ? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण पूर्वीच्या काळी प्रभाकर ,दिवाकर ,सुधाकर ,बंडोपंत ,गुंडोपंत शिवराम पंत, संभाजी पंत ,असे अनेक नावे ठेवली जात होती. एका गल्लीत एका चाळीत एका वाड्यात एका गावात अनेक शिवाजी, संभाजी, शहाजी ,बाबासाहेब सापडायचे .अलीकडच्या काळात अंश, स्वरांश ,अर्णव, साहिल ,समीर ,विजय, दिनकर ,दिलीप ,विकास हे नाव बहुतांश वेळा सापडतात.
नावावरून कोणाची जात ओळखण्याचा शोध जो भुजबळांना लागलाय तो आजपर्यंत तरी इतर कोणाला लागलेला नाही. कोणी कोणते नाव ठेवावं हे आजपर्यंत तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात देखील लिहिलेलं नाही मग असं असताना संभाजी शिवाजी ही नाव ब्राह्मण समाजात नसतात हा जावई शोध भुजबळांनी कशाच्या आधारावर लावला. त्यांना जर भिडेंवर टीका करायची होती तर ती खुशाल करायला हरकत नाही पण त्यासाठी ब्राह्मण समाजाला दोष देण्याचा किंवा शिव्या घालण्याचा अधिकार भुजबळांना कोणी दिला. बरं भुजबळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी विद्येची देवी सरस्वती आणि शारदा यांच्या बद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलं .कोणी कोणत्या देवाला मानावं ,कोणत्या मंदिरात जाऊन माथा टेकवावा,कोणाच्या पायावर नतमस्तक व्हावं हे देखील संविधानाने सांगितलेलं नाही किंवा तसं बंधन नाही घातले नाही. मग भुजबळांवर कोणी जबरदस्ती केली नव्हती की त्यांनी देवी शारदेची पूजा करावी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार घालावा, त्यांना वाटत असेल तर त्यांनी ज्याला वाटल त्याच्या प्रतिमेला हार घालावा. भारतात लोकशाही आहे त्यामुळे ही बंधन कोणावरच नाहीत पण तुम्हाला बोलण्याचे वागण्याचे लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून तुम्ही काहीही बरळायचं हे चालणार नाही. बर हे भुजबळ एकदा नव्हे तर यापूर्वी देखील अनेकदा बोलले आहेत स्वतः ओबीसी समाजाचे नेते म्हणून घेणारे भुजबळ हे त्यांच्या जातीपुरते मर्यादित आहेत हे अनेक वेळा सिद्ध झालं आहे. त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात काय काय केलं हे सगळ्या देशांना आणि जगाने पाहिलं आहे. कोणत्या कारणामुळे त्यांना बिन भाड्याच्या खोलीत जाव लागलं हे देखील सर्वांना माहित आहे. त्या खोलात जाण्याची गरज नाही पण बालीश बहु बायकात बडबडला याप्रमाणे भुजबळ यांनी जे अकलेचे तारे तोडले आहेत ते सहन न होणारे आहेत.
भुजबळांचे वय पाहता साठी बुद्धी नाठी झाली की काय असाही प्रश्न लोकांना पडला आहे .भुजबळांना जर सरस्वती आणि शारदा या देवी देवतांची पूजा करायची नसेल तर त्यांनी ती करू नये पण म्हणून त्यांना शिव्या देण्याची गरज नाही किंवा अपशब्द वापरण्याची गरज नाही. जे भुजबळ सांगतात की आम्ही शाहू फुले आंबेडकर यांच्या तालमीत शिकलोत त्यांनी आम्हाला शिकवलं मग तसा जर विचार केला तर भुजबळ आज 100 वर्ष वयापेक्षा जास्त वयाचे असायला पाहिजेत.
आपण बोलतो काय, कुठे बोलतो याच भान आणि जाण असायलाच पाहिजे.जी भुजबळ यांना नाहीये. शिवसेनेपासून सुरू झालेला भुजबळांचा प्रवास अजित पवारांच्या राष्ट्रवादी पर्यंत येऊन थांबलाय. प्रत्येक वेळी सत्तेसाठी भुजबळांसारख्या माणसाने मूल्य,तत्व,निष्ठा सगळं सोडून दिलेलं आहे हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे त्यांनी सर्वसामान्य माणसाला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही. कोणी कोणत्या देवाला मानायचं हा त्याचा त्याचा अधिकार आहे पण म्हणून एखाद्या जातीवर टीका करून त्यांच्या देवांवर टीका करून भुजबळ हे जाती जातीत तेढ निर्माण करत आहेत आणि त्यामुळे जो न्याय संभाजी भिडे अथवा इतर वाचाळ वीरांना लागला तोच न्याय भुजबळांना देखील लागला पाहिजे. आणि त्यांच्यावर देखील खटला दाखल झाला पाहिजे .तरच या राजकारणी मंडळींची गुर्मी आणि मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही
विशेष म्हणजे भुजबळ जे काही बरळले आहेत त्याच समर्थन अजित पवार, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे करतात की नाही याचा देखील त्यांच्याकडून खुलासा तातडीने होणे गरजेचे आहे. भुजबळांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकारच नाहीये कारण मंत्रिपदाची शपथ घेतानाच कुठल्याही व्यक्तीबद्दल, जातीबद्दल किंवा धर्माबद्दल मी आकस अथवा ममत्व भाव ठेवणार नाही अशी शपथ घेतली जाते ,जी भुजबळांनी देखील घेतली मात्र त्यांना या शब्दाचा वारंवार विसर पडतो .मतदानाच्या गाठोड्यासाठी मेलेली मढी उकरायची आणि त्यांच्या टाळूवरचं लोणी खायचं हा धंदा भुजबळांसारख्या अनेकांचा आहे. त्यांना कायद्याचा धाक दाखवून वेळीच रोखले नाही तर जाती जातीत आणि धर्म धर्मात तेढ निर्माण होऊन वनवा पेटायला वेळ लागणार नाही .भुजबळ जे काही बोललेत ते बुद्धीला तर न पटणारच आहे परंतु निषेधार्य देखील आहे आणि आता ते ज्या सत्तेत आहेत ते सत्ताधारी त्यांच्यावर कारवाई करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे
Leave a Reply