गेवराई- माजीमंत्री तथा शिवसेना नेते बदामराव पंडित यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजी नगर वरून बीडला येताना भेट दिली.यावेळी पवार आणि पंडित यांच्यामध्ये गुप्त खलबते झाली.माजी आ अमरसिंह पंडित यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने पवारांनी बदामराव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार हे बीड येथे स्वाभिमान सभा घेत आहेत.या सभेपुर्वी पवार यांनी दोन दिवस छत्रपती संभाजी नगर येथे तळ ठोकला होता.या ठिकाणी त्यांनी बीड जिल्ह्यातील अनेक आजी माजी आमदार पुढारी कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी घेतल्या.
माजीमंत्री तथा शिवसेनेचे नेते बदामराव पंडित यांची पवार यांनी संभाजीनगर येथे भेट घेतली.त्यानंतर पंडित यांनी पवारांना गेवराई येथील निवासस्थानी चाहपणासाठी आमंत्रित केले.
गुरुवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पवार हे गेवराई येथे आले.त्याठिकाणी बदामराव पंडित,युध्दाजित पंडित यांनी त्यांचे स्वागत केले.चहापान झाल्यानंतर पवार आणि बदामराव यांच्यात बंद दाराआड खलबते झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार यांनी पुन्हा जुन्या नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे.त्यामुळेच त्यांनी पंडित यांची भेट घेतली आहे.
Leave a Reply