बीड -महागड्या उपचाराच्या नावाखाली रुगणांकडून लाखो रुपये अतिरिक्त उकळणाऱ्या बीड जिल्ह्यातील पाच हॉस्पिटल वर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बीडच्या डॉ बडे यांच्या शिवाजीराव हार्ट केअर युनिट ला दहा लाखांचा दंड करण्यात आला आहे. एकीकडे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा म्हणायचं आणि दुसरीकडे रुग्णांच्या खिशावर दरोडा घालायचा प्रकार बीडमध्ये झाल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना रुग्णांच्या उपचारासाठी कल्याणकारी योजना ठरत आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात ७३ तक्रारी प्राप्त दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ६९ तक्रारी निकाली काढलेल्या आहेत. यात विशेष करून बीड जिल्ह्यातील ५ हॉस्पिटल चालक डॉक्टरांवर रुग्णांकडून औषध आणि इंजेक्शन साठी अतिरिक्त पैसे वसूल केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी संबंधित हॉस्पिटल चालक डॉक्टरांना ११ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. कुठेही चुकीचे काम आढळून आल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आयुष्यमान भारत मिशन समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले.
शिवाजीराव बडे हार्ट केअर बीड या हॉस्पिटलला दहा लाख रुपयांचा दंड, आधार हॉस्पिटलला ७८ हजार, मेडिकेअर हॉस्पिटल १ लाख ३० हजार, वेलनेस मल्टी स्पेशालिस्ट १३ हजार ५९६ रुपये, संजीवनी हॉस्पिटल माजलगाव ३६,००० रुपये याप्रमाणे दंड ठोठावण्यात आला असून यापैकी काही हॉस्पिटलकडून दंड भरण्यात आल्याचे आयुष्मान भारत मिशनचे डॉ. शेटे यांनी दंड ठोठावला आहे.
आयुष्यमान भारत संदर्भात विविध योजना अंतर्गत वेगवेगळ्या तक्रारी केल्या जातात त्या तक्रारींची पडताळणी करून संबंधीत हॉस्पिटलला दंड करण्यात येतो. बीड जिल्ह्यातील ५ हॉस्पिटल्सला दंड करण्यात आलेला आहे. बीडसह राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी दंड ठोठावण्यात आलेला आहे त्या दंडाची रक्कम कॅन्सरग्रस्त रुगणांसाठी देण्यात येणार आहे.
आज दिनांक 06 एप्रिल 2026 रोजी ओमप्रकाश शेटे, अध्यक्ष, आयुष्मान भारत मिशन समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJY) यांची संयुक्त आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे संपन्न झाली.
सदर बैठकीस श्री शिवकुमार स्वामी (निवासी जिल्हाधिकारी, बीड), डॉ. शंकर धपाटे (अधिष्ठाता, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई), डॉ. उल्हास गंडाळ (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बीड), डॉ. नागेश चव्हाण (अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड), डॉ. सचिन शेकडे (जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी, बीड), डॉ. संजय कदम (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद बीड) श्री शैलेश फडसे, (मुख्याधिकारी नगरपरिषद बीड), डॉ. अशोक गायकवाड (जिल्हा समन्वयक, PMJAY व MJPJY, बीड), डॉ. राजकुमार जाधव (जिल्हाप्रमुख, सहाय्यक अंमलबजावणी संस्था MD India, बीड), श्री दिनेश जाधव (जिल्हा व्यवस्थापक, CSC, बीड) तसेच श्री भरत बादाडे (जिल्हा समन्वयक, आशा स्वयंसेविका) उपस्थित होते.
बैठकीमध्ये आयुष्मान कार्ड वितरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वंदना कार्ड, तसेच नव्याने योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्रिय सहभागाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
जिल्ह्यातील आयुष्मान कार्ड वितरणाच्या कामाबाबत माननीय अध्यक्ष महोदयांनी समाधान व्यक्त केले. तसेच या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा यंत्रणेने अधिक प्रभावी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.
याशिवाय, योजनांचे कॅशलेस स्वरूप अबाधित ठेवण्यासाठी प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





Leave a Reply