बीड -बीडच्या नगररोड भागात असलेल्या एका मोठ्या शिक्षण संस्थेत कार्यकारिणीच्या बैठकीनंतर संस्थाचालकात चांगलीच वादावादी झाली. बैठकीला अध्यक्ष आणि सचिव उपस्थित नसल्याने बैठक रद्द झाली मात्र बाहेर पडल्यावर झालेल्या वादावादी नंतर कर्मचारी भरती आणि बढती वरून हा वाद झाल्याची चर्चा आहे.
चाळीस पन्नास वर्षाची परंपरा असलेल्या बीडच्या नगर रोड भागातील एक शिक्षण संस्था सध्या संस्थाचालकांच्या वादामुळे चर्चेत आहे. या संस्थेवर काही महिन्यापूर्वी एका शिक्षक असलेल्या व्यक्तीची सभापती म्हणून निवड केली गेली. ही निवड अनेक संचालकांना विश्वासात न घेता केली गेली. त्यामुळेच नवीन सभापती आणि जुने संचालक यांच्यात खडाखडी सुरु आहे.
नव्याने आलेल्या सभापती ने सगळे अधिकार आपल्याकडे घेत थेट निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप सुरु केला. कानामागून आला आणि तिखट झाला अशी परिस्थिती झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र अध्यक्ष असोत कि सचिव यांनी त्याकडे सोयीस्कर पणे दुर्लक्ष केले.
सोमवारी संस्थेची कार्यकारिणी बैठक आयोजित केली होती. मात्र अध्यक्ष आणि सचिव हजर नसल्याने बैठक रद्द करण्याबाबत एकमत झाले, त्यावेळी सभापती यांनी आपल्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी असे म्हटले परंतु डॉक्टर असणाऱ्या जेष्ठ संचालकांनी त्याला आक्षेप घेतला. त्यावरून वाद झाला.
त्यानंतर संस्थेत पंधरा वर्षांपूर्वी भरती केलेल्या दोन शिपायापैकी एकाला अवघ्या तीन वर्षात पदोन्नती दिल्याचा मुद्दा समोर आला. ज्याला पदोन्नती न देता डावलले त्या शिपायाने याचा जब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावरून देखील सभापती यांचा आवाज चांगलाच वाढला.
बैठक रद्द झाल्यानंतर डॉक्टर आणि सभापती यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. या संस्थेत अनेक गैरप्रकार झाले आहेत, ज्यावर अध्यक्ष, सचिव किंवा सभापती मौन बाळगून आहेत. त्यामुळे देखील संचालक मंडळींनी आपला राग व्यक्त केला.
या संस्थेत झालेल्या वादाची चर्चा शहरात जोरदारपणे सुरु आहे. या संस्थेने नगर परिषद ची परवानगी न घेता बांधकामं सुरु केले आहे, यावरून देखील तक्रारी झालेल्या आहेत. आता सभापती यांच्या अतिरिक्त हस्तक्षेपामुळे वाढू लागलेला वाद कोणत्या स्तरापर्यंत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





Leave a Reply