बीड –बीड जिल्हा न्यायालयात मंगळवारी दुपारीच बारा वाजण्याच्या सुमारास मोठा राडा झाला. वकील संघांचे सदस्य असलेले ऍड राम पांडुरंग डोंगरे यांना शाहूनगर भागातील राधाकिसन करपे व इतरांनी मारहाण केली. याविरोधात तक्रार देण्यासाठी वकिलांनी पोलीस अधीक्षक आणि शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी वकील राम डोंगरे यांच्याविरोधात महिलेने तक्रार दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी दिली. त्यानंतर हे सगळे वकील पोलीस अधीक्षक यांच्या भेटीसाठी गेले.
बीड जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ऍड राम डोंगरे हे आपले कामकाज करत बसले असताना दुपारीच बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास राधाकिसन करपे आणि तीन चार महिला आणि पुरुष त्यांच्याकडे आले.
या लोकांनी अचानक बाचाबाची आणि शिवीगाळ करत वकील डोंगरे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर वकिलांनी हा सगळा प्रकार न्यायाधीश यांच्या कानावर घालून शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली.
वकील संघांचे पदाधिकारी आणि सर्व वकील बांधव शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांनी त्यांच्या विरोधात महिलेने तक्रार दाखल केली असून तुम्ही तक्रार द्या मी ती पण दाखल करून घेतो असे सांगितले.
त्यानंतर संतप्त झालेल्या वकिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. वकिलांना मारहाण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.












Leave a Reply